मुफ़्ती फारूक यांनी मिलादच्या निमित्ताने तरुणांना केले आवाहन, आझाद ग्रुपचे केले कौतुक

कळंब : रबीउल अव्वलच्या पवित्र महिन्याच्या औचित्याने कळंब शहरातील आझाद ग्रुपने घेतलेला निर्णय सध्या चर्चेत आहे. यावर्षी ईद-ए-मिलाद साजरी करताना डीजे न लावण्याचा निर्धार करून, त्याऐवजी सीरत-उन-नबी (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) प्रश्नोत्तर स्पर्धेचे आयोजन करून आझाद ग्रुपने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना मुफ़्ती फारूक यांनी आपल्या विशेष संदेशात सांगितले की, “आझाद ग्रुपने फक्त एक डीजे मशीन बंद केले नाही, तर शैतानाचा एक दरवाजा बंद केला आहे. तुमचा निर्णय सांगतो की आपल्या आनंदाचा मार्ग पापाच्या दलदलीत नसून सुन्नतीच्या प्रकाशात आहे.” त्यांनी हेही स्पष्ट केले की पैगंबरप्रेम हे कधीही डीजेवर अवलंबून नसते.

मुफ़्ती फारूक म्हणाले की, आझाद ग्रुपच्या या निर्णयाने फक्त कळंबचं नव्हे तर संपूर्ण समाजाला जागं केलं आहे. “तुम्ही उम्मतच्या जमीरला हलवून सोडलं, तरुणाईला योग्य मार्ग दाखवला आणि येणाऱ्या पिढ्यांना नूरानी वाट दाखवली. मला वाटते आझाद ग्रुपने खरोखरच एक उदाहरण कायम केलं आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आवाहन केले की, जर प्रत्येक मुसलमानाने डीजेपासून दूर राहून कुरआनचा संदेश पसरवला, अनाथांच्या डोळ्यातले अश्रू पुसले, विधवा व गरजूंची मदत केली, गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला, मशिद-मदरशांची सेवा केली तरच खऱ्या अर्थाने नबीच्या जन्माचा आनंद साजरा होईल. “नबीच्या नावावर गोंधळ, नाचणे आणि डीजे वाजवणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. खरा आनंद म्हणजे लोकांच्या दुःखात हातभार लावणे होय,” असे ते म्हणाले.

मुफ़्ती फारूक यांनी चेतावणी दिली की, “कयामतच्या दिवशी जर नबी विचारतील की माझ्या जन्माचा आनंद तुम्ही कसा साजरा केला, कुरआन, दरूद आणि नमाजे वाचून की डीजे आणि गोंधळ करून तर आपल्याकडे काय उत्तर असेल? म्हणूनच अशी कृती करू नका ज्यामुळे अल्लाह आणि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज होतील.” शेवटी त्यांनी आझाद ग्रुपचे मनापासून अभिनंदन केले आणि दुआ व्यक्त केली की ईश्वर त्यांना दुनियेत व शेवटी उत्तम मोबदला देवो. तसेच कळंब शहरातील सर्व नागरिकांनीही या निर्णयातून प्रेरणा घेऊन भविष्यात डीजेपासून परावृत्त व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!