धाराशिव लाइव्हचे संपादक ढेपे यांना पोलीस निरीक्षकाची थेट अटकेची धमकी?

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

धाराशिव: तुळजापूरमध्ये ड्रग्ज आणि अवैध धंद्यांवर सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केल्यामुळे ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी थेट अटकेची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ढेपे यांनी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी (गु.र.क्र. १८९/२०२५) साक्षीदार म्हणून जबाब देण्यासाठी सुनील ढेपे यांना २० ऑगस्ट रोजी नोटीस पाठवण्यात आली होती. पण नोकरीनिमित्त पुण्यात राहत असल्याने आणि या प्रकरणाची माहिती नसल्याने त्यांनी पोलिसांना आपण हजर राहू शकत नाही, असे कळवले. या उत्तरावर समाधान न झाल्याने, आज सकाळी १०:३५ वाजता पोलीस निरीक्षक मांजरे यांनी ढेपे यांना व्हाट्सॲपवर फोन केला आणि “नोटीसचा जबाब देण्यासाठी तुळजापूरला ये, नाहीतर उद्या पुण्यात पोलीस पाठवून तुला अटक करेन,” अशी थेट धमकी दिली.

बातमीच्या रागातून धमकी?

‘धाराशिव लाइव्ह’ने मागील काही दिवसांपासून तुळजापूर परिसरातील वाढलेल्या ड्रग्जच्या जाळ्यावर आणि इतर अवैध धंद्यांवर निर्भीडपणे वृत्तमालिका प्रकाशित केली होती. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच बातमीदारीचा राग मनात धरून, जुन्या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून नोटीस पाठवून आणि आता अटकेची धमकी देऊन आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुनील ढेपे यांनी केला आहे.

पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

या घटनेनंतर, ढेपे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला अशा प्रकारे धमकी देणे हा सत्तेचा दुरुपयोग असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.”
या प्रकारामुळे जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस अधीक्षकांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!