कळंबमध्ये मतदारयादीत घोटाळा? 2000 बोगस मतदार? उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

कळंब नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माजी नगराध्यक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पॅनल प्रमुख संजय मुंदडा यांनी कळंबमधील मतदारयादीत तब्बल 2000 हून अधिक बोगस मतदारांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देत प्रशासन व एका विशिष्ट संघटनेवर तीव्र निशाणा साधला.

मुंदडा यांनी सांगितले की, नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले आहेत. त्यांच्या मते, एका विशिष्ट पक्षाच्या मातृसंघटनेने प्रशासनाशी संगनमत करून कळंब शहराशी कोणताही संबंध नसलेल्या मतदारांची नावे यादीत घालण्याचे काम केले आहे. त्यांनी थेट नाव न घेतले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.

मुंदडा यांच्या मते, 10 प्रभागांपैकी अनेक ठिकाणी स्थानिक मतदारांची नावे वेगळ्या प्रभागात टाकली गेली आहेत, तर प्रत्येक प्रभागात बाहेरील बोगस मतदार जोडले गेले आहेत. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, एका प्रभागात 107 नव्या नावांपैकी 7 जणांचा कळंब शहराशी काहीही संबंध नाही. हे सर्व एक संगठित षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 2000 पेक्षा जास्त असे नावे लावण्यात आले आहेत ज्यांचा कळंब शहराशी काहीही संबंध नाहीये.

त्यांनी पुढे सांगितले की, “स्थानिक मतदारांची नावे बदलून मतांचा टक्का कमी करायचा आणि मतदानाच्या शेवटच्या दोन तासांत बोगस मतदारांच्या माध्यमातून निकाल आपल्या बाजूने वळवायचा” असा संपूर्ण डाव रचण्यात आला आहे.

मुंदडा यांनी उपविभागीय अधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनावरही निर्लज्ज संगनमताचे आरोप करत तात्काळ बोगस नावे मतदारयादीतून हटवण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा त्यांनी इशारा दिला आहे.

या आरोपांनंतर शहरात प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांचा प्रश्न आहे की, जर या आरोपांत तथ्य असेल, तर ही लोकशाहीवरच आघात करणारी बाब ठरेल. त्यामुळे शासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता कळंबकरांकडून होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!