
कळंब शहर आणि परिसरात चोरांचा उच्छाद, 5 महिन्यात अर्धा कोटी रुपयांची चोरी
नवीन पीआय साहेबांसमोर चोरांचे आव्हान
कळंब : पोलीस स्टेशन हद्दीत चोरांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांचा धाक चोरांना उरला की नाही? असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण
कळंब शहरात मागील साडेपाच महिन्यात 9 चोरीच्या घटनेत जवळपास 30 लाखांचं सोन आणि मुद्देमाल चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर कळंब पोलीस स्टेशन हद्दीतून एकूण 15 पेक्षा जास्त मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत त्यात मोबाईल चोरीच्या घटना या वेगळ्या. त्यामुळे नवीन फौजदार साहेबांसमोर चोरांचे मोठे आव्हान असणार आहे. साहेब येतात आणि साहेब जातात, मात्र कळंब शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढचं होताना दिसत आहे. मागच्या साहेबांनाही त्या आवरता आले नाहीत. त्यामुळेचं 6 महिन्यात अर्धा कोटीपेक्षा जास्त मूल्य असलेलं सोनं-चांदी, मोटारसायकल, मोबाईल आणि रोखरक्कम पोलिसांना आव्हान देत चोरीला गेली आहे.
मागील ५ महिन्यात घडलेल्या चोरीच्या घटना
१. १५ फेब्रुवारी २०२५ – महानंदा बाबूराव देशमुख यांच्या गाळ्यातील २० ग्रॅम सोन्याचे दागिने (मूळतः २ लाख रुपये) गर्दीचा फायदा घेत बसस्थानकातून चोरीला गेले.
२. १० मार्च २०२५ – राजाभाऊ शिंदे व त्यांच्या पत्नीला मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी खडकी शिवारात लुटले. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोने (किंमतः १६ हजार रुपये) जबरीने हिसकावण्यात आले.
३. ५ एप्रिल २०२५ – शिवाजीनगर येथील दीपक हनुमंत यांच्या घरात शिरून चोरट्यांनी ५० ग्रॅम सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम २ लाख ७०० रुपये चोरून नेले.
४. २२ एप्रिल २०२५ – दीपा अजित परदेशी यांच्या घरामधून १९ ग्रॅम सोने (किंमत : १ लाख ५ हजार रुपये) बसमध्ये चढताना चोरीस गेले.
५. २८ एप्रिल २०२५ – हसेगाव (के.) येथील रोहन रमेश खरडकर यांच्या घरातून मध्यरात्री ६१ ग्रॅम सोने व रोख रक्कम मिळून ४ लाख ४८ हजार रुपयांची चोरी.
६. ३-५ मे २०२५ – संभाजीनगर येथील संतोष अडसूळ यांच्या घरात चोरी; ३० ग्रॅम सोने व रोख रक्कम २ हजार ५०० रुपये असा एकूण २ लाख ७ हजार रुपये मुद्देमाल चोरीला गेला.
७. १० मे २०२५ – बसस्थानकाजवळ शोभा गावकरी यांच्या पर्समधून ६ ग्रॅम सोने (९१ हजार १५ रुपये) चोरले गेले.
८. २३ मे २०२५ – सखुबाई सांगळे यांचे एक तोळे सोने कळंब-पारा बसमध्ये गर्दीत चोरीला गेले.
९. १२ जुलै २०२५ – पोलीस अधिकारी असल्याचे भासून सविता लोंढे यांच्या गळ्यातील २५ ग्रॅमचे मंगलसूत्र (२ लाख २० हजार रुपये) फसवून नेले.
आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा उच्छाद
कळंब एसटी स्टँड आणि आठवडी बाजारात सर्रास मोबाईल चोरीला जातात. दर आठवड्यात या चोरीच्या घडतात. यात काही टोळ्या सक्रिय आहेत. दर आठवड्याला जर आशा घटना घडून सुद्धा पोलिसांना यश येत नसेल तर हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. नुकतंच दोन मोबाईल चोरांना नागरिकांनी रंगेहाथ पकडून चोप दिला. या घटनेनंतर पोलीस नेमकं काय करीत आहेत, असा सवाल सामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. चोरीसह बनावट दारूविक्री, अवैध धंदे, बेशिस्त वाहतूक पार्किंग या समस्या देखील कळंबकरांच्या पाचवीला पूजल्या आहेत.
नुकतंच पोलीस निरीक्षक रवी सानप यांची बदली होऊन त्यांच्या जागी पीआय अजित चिंतले यांची बदली झाली आहे. त्यांनी नुकतंच कार्यभार सांभाळलं असलं तरी त्यांच्यासाठी कळंब आव्हान असणार आहे. वाढत्या चोऱ्या हा त्यांच्यासमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आता नवीन साहेब याला आळा घालतात की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतात, हे पाहणं महत्वाचं ठरेल.


