
कळंब रोटरीचा डिकसळच्या शाळेला ‘डिजिटल’ साज; वृक्षारोपणासह खत निर्मिती
डिकसळ (कळंब) : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि पी. पी. पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर, डिकसळ येथे डिजिटल क्लासरूम, सेंद्रिय खत निर्मिती बॅरल्स आणि वृक्षारोपण अशा त्रिसूत्री सेवा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता या तीनही क्षेत्रांना जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. पी. पी. पटेल फाउंडेशनच्या CSR प्रकल्पातून शाळेला आधुनिक डिजिटल क्लासरूम, इयत्ता पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम असलेले डिजिटल लर्निंग सॉफ्टवेअर तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन व इन्स्टॉलेशन पूर्ण करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. या सुविधेचा थेट लाभ शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
यावेळी शाळेला दोन सेंद्रिय खत निर्मिती बॅरल्स देण्यात आले. ओला कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय खत निर्मिती आणि निर्माल्याचा पुनर्वापर करून खत तयार करण्याबाबत रो. रवि नरहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. घरातील सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ‘एक विद्यार्थी–एक झाड’ या संकल्पनेतून लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रकल्पाचा थेट लाभ सुमारे ३०० विद्यार्थ्यांना, तर अप्रत्यक्ष लाभ सुमारे ३०० कुटुंबांना होणार आहे. या उपक्रमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, जबाबदार उपभोग व उत्पादन, हवामान कृती आणि उद्दिष्टांसाठी भागीदारी या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना हातभार लागणार आहे. या प्रकल्पासाठी रो. डॉ. अभिजीत जाधवर यांनी पी. पी. पटेल फाउंडेशनच्या CSR माध्यमातून डिजिटल क्लासरूम व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. प्रकल्प प्रमुख रो. सतीश मांडवकर यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमास रो. रवि नरहिरे, रो. अभिजीत भिसे, रो. सतीश मांडवकर, रो. संजय देवडा, रो. निखिल भडंगे, रो. डॉ. सुयोग काकाणी, रो. डॉ. साजेद चाऊस, रो. डॉ. अभिजीत जाधवर, रो. डॉ. गिरीश कुलकर्णी, रो. अरविंद शिंदे, रो. डॉ. सचिन पवार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आगामी काळात शाळेत रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना, डिजिटल क्लासरूमचा नियमित आढावा, सेंद्रिय खत निर्मिती व निर्माल्य व्यवस्थापनाचे प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व व पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रो. रवि नरहिरे यांनी दिली.


