धाराशिव जिल्ह्यात ‘संगीत बारी’च्या नावाखाली नंगानाच; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

बारी बंद करून एसपी रितू खोकर मॅडम वाचवणार का भगिनींचे कुंकू?

धाराशिव: मुंबई-पुण्यातील डान्सबारच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यात ‘संगीत बारी’च्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे सामाजिक शांतता आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य धोक्यात आले आहे. चोराखळी येथील कथित कलाकेंद्रात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने या प्रकरणातील गुन्हेगारीचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. परंतु, पोलिसांकडून या गंभीर बाबीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नियम धाब्यावर बसवून रात्रभर सुरू असलेल्या या अश्लील नृत्यांमुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

‘कले’च्या नावाखाली अवैध धंदे

येरमाळासारख्या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरात असे अवैध व्यवसाय चालत असल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. या कलाकेंद्रांमध्ये रात्रभर अश्लील नृत्ये सुरू असतात. यात दारूच्या नशेत तरुण पैसे उधळताना दिसतात. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढी या दलदलीत अडकत असून, शेतीतून मिळालेले पैसे किंवा उसनेवारी करून आणलेले पैसे येथे उधळले जातात. यामुळे अनेक कुटुंबांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. काही प्रकरणात तर या व्यसनामुळे कौटुंबिक कलह वाढून पत्नी माहेरी निघून गेल्याचे आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या झाल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

रात्री १० नंतर सर्वसामान्य दुकाने बंद करायला लावणारे पोलीस प्रशासन, रात्रभर चालणाऱ्या या संगीत बारीकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सोलापूर-संभाजीनगर महामार्गावर उघडपणे चालणारे हे अवैध धंदे पोलिसांना दिसत नाहीत का, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ‘पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सुरू आहे का?’ अशा चर्चांनाही आता उधाण आले आहे. त्यामुळे, कायद्याचे रक्षकच या अवैध कृत्यांना पाठबळ देत असल्याचा संशय बळावत आहे.

(लवकरचं या बारीतील नंगानाचचे व्हिडीओ अपलोड करू)

तातडीने कारवाईची मागणी

धाराशिव हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीतही तरुण पिढी पैशांची अशी उधळपट्टी करत असल्याने समाजावर नकारात्मक परिणाम होत आहे. लहान वयाच्या तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण या व्यसनापायी आपल्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती खराब करत आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी या गंभीर समस्येची दखल घ्यावी आणि तातडीने या संगीत बाऱ्यांवर कारवाई करून त्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, अशी जोरदार मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. या महिला अधिकाऱ्यांकडून महिलांच्या कुंकूचे रक्षण करण्यासाठी कठोर पाऊल उचलले जाईल, अशी आशा समाज व्यक्त करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!