धाराशिवच्या पठ्ठ्यानं अधिवेशन गाजवलं

आमदार कैलास पाटलांनी सभागृहात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली

त्याचं काय आहे धाराशिव जिल्हा ठरला नीतीआयोगाच्या यादीतला मागास जिल्हा. वास्तवात त्यापेक्षा वाईट परिस्थिती. त्यामुळे भरमसाठ कर्तृत्व, नेतृत्व असून सुद्धा आमचं कॉन्फिडन्सचं घोडं इथं पेंड खातं. त्यामुळे नेते लोक्सपण फारसं दम लावत नाहीत, त्यामुळे तर मागास झाला ना जिल्हा. पण दुसऱ्यांदा आमदार झालेले कैलास घाडगे-पाटील याला अपवाद ठरत आहेत, असंच दिसतंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला अन महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या मायक्रो मायनॉरीटी झाली. त्यातले किती आमदार ईडी-बिडी-सिडीच्या भीतीने बोलतील विरोधकाची भूमिका बजावतील का? याबाबत शंकाच होती. त्यातली त्यात धाराशिव-कळंबचे आमदार कैलास दादांना मी एकेदिवशी बोललो की दादा, सत्ताधाऱ्यांच्या गर्दीत आपला आवाज निघेल का? अधिवेशनात तर खाऊन टाकतील की हे लोकं. त्यावर आमदार साहेब म्हणाले, मुस्तान भाई कसंय बहुमताच्या मुंडक्याचा फायदा घेऊन तर सगळेच बोलतात. पण आपण या गर्दीच्या समोर उभं राहून शेतकऱ्यांचे, मागासवर्गाचे आणि सामान्यांचे प्रश्न तितक्याच ताकदीने लावून धरू. उलट या गर्दीच्यासमोर बोलायला जास्त स्कोप आहे.

अगदी तसंच झालं ना..! यंदा पावसाळी अधिवेशनात विरोधी बाकावर बसलेल्या तुरळक आमदारांपैकी नाना पटोले, विजय वड्डेटीवार, अनिल परब, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे या आमदारांनी यंदा विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना वेठीस धरलं. त्यात नानांनी व्हेलमध्ये उतरून सुरुवातीलाचं आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण यात एक चेहरा असा होता ज्याच्या मतदारसंघातील मतदारांनी कदाचितचं यापूर्वी आपल्या आमदाराला इतके प्रश्न लावून धरताना पाहिले असतील. ते म्हणजे धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील. आमदार कैलास पाटलांची ही तशी दुसरीच टर्म. फारसं बोलून नाही तर संयमाने कामातून बोलायची त्यांची शैली. यंदा त्यांनी त्यांच्याबद्दलचे सगळे समज-गैरसमज दूर केले. वेळ पडल्यास सभागृहात मंत्र्यांना देखील धारेवर धरून त्यांनी धाराशिवचं पाणी विधानभवनात दाखवून दिलं. धाराशिवला भाई उध्दवराव पाटील यांच्यासारखे आमदार राहून गेलेत ज्यांनी मुख्यमंत्रीपदाला लाथ मारली पण जनतेशी आणि त्यांच्या कामाशी प्रामाणिक राहिले. जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांना सळोकी पळो केलं होतं. त्यांचाच वारसा कुठेतरी दुसरे आजचे पाटील पुढे नेतायेत. मात्र, हे इतकं सोपं नाहीये. आधीच सुरतेच्या मार्गेवरून परत आल्याने शिंदेंच्या डोक्यात बसलेले हे आमदार. त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या विकासकामाला निधी मिळेल का, याची शास्वती नाही. मग प्रश्न मार्गी कसे लागणार? तर अशा परिस्थितीत प्रश्नांचा योग्य अभ्यास करत विधानसभेत त्याला वाचा फोडायची हा पर्याय त्यांनी अवलंबला. तसे फारसे शांत असणारे कैलास पाटील यंदा सामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शेतीवर जिवंत असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या आमदाराने शेतकऱ्यांचा विषय लावून धरला. पोलीस जेंव्हा शेतकऱ्यांना गुंडांसारखं मारतात तेंव्हा विधानसभेत पोलीस हे शेतकऱ्यांसाठी की पवनचक्की माफियांसाठी? असा लक्षवेधीद्वारे थेट सवाल विचारणारे कैलास पाटील होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणता पण त्याची वेळ आणि नियम पण सांगा, असं सांगणारे कैलास पाटील होते. बोगस बियाणे, कृत्रिम फुल उत्पादनावर बंदी यावर देखील कैलास पाटलांनी आवाज उठवला. विरोधक असलो तरी रस्ते निधी अडवून जनतेवर का अन्याय करता, असा खडा सवाल विचारण्याचं काम देखील कैलास पाटलांनी केला.

धाराशिव जिल्ह्यात ड्रग्सचा विळखा मोठ्याप्रमाणात वाढला होता. पोलिसांनी कारवाई केली, पण त्यात कशा त्रुटी आहेत आणि कायदात सिस्टीमचा वापर करून कशा पळवाटा काढून रॅकेट चालवला जातो, यावर अभ्यासू मुद्दे मांडण्याचं काम देखील कैलास पाटलांनी केला. महामार्गाच्या कामात कसा हलगर्जीपणा केला जातो हे सांगून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दाखल घेण्यास भाग पाडले. शिक्षण मंत्र्यांकडे जिल्हापरिषद शाळेत विषय शिक्षक देण्यात यावा, ही मागणी देखील सभागृहात लावून धरली. त्यांच्या मागणीची तीव्रता पाहत शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक देण्याचे आदेशचं देऊन टाकले. कळंब तालुक्यातील लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी यंदा कैलास पाटलांनी रुळावर आणली. महसूल मंत्री बावनकुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बसून विषय समजून सांगितला. अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी आमदार असताना पाटलांनी विधानसभेत पाटीलकी दाखवत मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडली आणि त्यांना प्रकाशझोतात आणले. हे ही नव्हे थोडके, असंच म्हणावं लागेल. कारण इतके प्रश्न आणि असा पाठपुरावा कदाचितचं कुठल्या आमदाराकडून कळंब-धाराशिव मतदारसंघातील मतदारांनी पाहिला असेल. बाकी काहीही म्हणा विधानसभेत आवाज उठवण्यासाठी धाराशिवला कैलास पाटलांच्या रुपात एक खमक्या आमदार मिळालाय. म्हणूनच मतदारसंघात म्हणायला लागलेत धाराशिवच्या पठ्ठ्याने अधिवेशन गाजवलं.

मुस्तान मुमताज मुख्तार मिर्झा
(मुख्य संपादक मुद्द्याचं बोलू)
8983833838

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!