
कळंब पोलिसांच्या अमानुष मारहाणीत एकाचा मृत्यू? नातेवाईकांचा गंभीर आरोप
आरोपात सत्यता काय तपासण्याची मागणी
कळंब : कळंब पोलिसांनी ढोराळा गावातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी भैरु चौधरी यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी उशिरा रात्री भैरो चौधरी कळंब चौकात आपल्या गावाकडे जाण्यासाठी थांबले होते. रात्र खूप झाल्याने त्यांना कोणतीही गाडी मिळत नव्हती. त्याचवेळी कळंब पोलिसांची पेट्रोलिंग गाडी तेथे आली आणि पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेल्याचे चौधरी यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
पोलीस ठाण्यात नेऊन भैरो चौधरी यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पहाटेच्या सुमारास कळंब बस स्टँडजवळ त्यांना आणून टाकण्यात आले. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे भैरु चौधरी यांना उठताही येत नव्हते. तेथे असलेल्या एका पानटपरीवाल्याला त्यांनी आपल्या लहान भावाचा नंबर देऊन त्याला बोलवायला सांगितले. भावाने तात्काळ कळंब गाठून मोटरसायकलवरून त्यांना घरी आणले. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. मात्र, त्यांना पुन्हा तीव्र वेदना आणि रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. मुरुड येथील रुग्णालयात नेत असतानाच गाडीत त्यांचा मृत्यू झाला.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, भैरो चौधरी यांच्या शरीरावर मारहाणीचे अनेक गंभीर व्रण होते. पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला असून, याबाबत धाराशिव एसपींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी त्या रात्रीच्या कळंब पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. तसेच, शहरातील बस स्टँड आणि तेथे जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुरुड, शिराढोन, कळंब पोलिसांकडून दाद न मिळाल्याने नातेवाईकांनी मुरुड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. मागणी तीव्र केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता मुरुड येथील रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
या सगळ्या प्रकरणाने आता धाराशिव एसपी आणि कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार हे मुंबईत अधिवेशनात कार्यरत असल्याने त्यांच्याकडील चार्ज हा तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांच्याकडे आहे. तर कळंब पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. कळंब पोलिसांना एका निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे, नुकतेच बार्शी पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथील काकासाहेब खडके यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्याला २४ तास उलटले नसतील तोच कळंब पोलिसांवर हा आरोप करण्यात आला आहे.
कायद्याचे रक्षकच जर सामान्य माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असतील, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कळंब पोलीस निरीक्षक रवी सानप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी कळंब पोलीस स्टेशनमधील त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चित्र स्पष्ट करावे. जर त्यात त्या रात्री पेट्रोलिंग करणारे पोलीस दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास उडून जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.


