वादग्रस्त पोस्ट करून शहराची शांतता बिघडवाल तर खबरदार! पोलीस निरीक्षक सानप यांचा इशारा

कळंब : वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर अपलोड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कळंब पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिला आहे. सध्या राज्यभर औरंगजेबच्या कबरीवरून वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टमुळे काही भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. उमरगा तालुक्यात एका तरुणाने वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने वादंग झालेलं पाहायला मिळालं.

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुडी पाडवा हे सण पुढील काही दिवसात येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कळंब शहरात पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सर्व समाजाची बैठक बोलावली होती. यादरम्यान त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता, यापूर्वी जसे शहरात एकतेने राहत होते तसेच एकमनाने राहावे, असे आवाहन केले. तर वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांना तात्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील सानप यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले दोन्हीकडील तरुण आशाप्रकारे पोस्ट करत आहेत, आम्हाला पुरावा मिळत आहे. आम्ही दोन्हीकडील तरुणांवर गुन्हे दाखल करणार आणि संबंधित पोस्ट पुरावा म्हणून वापरणार, असं पीआय सानप म्हणाले. यादरम्यान शहरातील सर्व समाजातील मंडळी बैठकीला उपस्थित होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!