
कळंबच्या त्या महिलेची हत्या कोणी केली? ही माहिती आली समोर
कळंब : शहरातील द्वारका नगरी वसाहतीत राहणाऱ्या मनीषा बिडवे-कारभारी हिचा 27 मार्च रोजी सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. घातपात की आत्महत्या याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्येप्रकरणाशी देखील संबंधित महिलेचे नाव जोडले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या महिलेचं संतोष देशमुख प्रकरणाशी नाव जोडलं असून, हत्येबाबत शंका उपस्थित केली आहे. मात्र कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी हा दावा फेटाळला आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत मागील काही वर्षांपासून मनीषा कारभारी-बिडवे अंदाजे 40 ते 45 या वयाची महिला राहत होती. ती एकटीच राहत होती. ती मूळची बीड जिल्ह्यातील आडस गावची राहणारी होती. अचानक 27 मार्च रोजी तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत तिच्याच घरात आढळून आला. आता तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहे.
मात्र याबाबत सूत्रांकडून अशी माहिती आहे की, संबंधित महिलेचा खुन तिच्याच ड्रायव्हरने केला आहे. संबंधित आरोपीचे नाव रामेश्वर भोसले, रा. टाकळी असे असून तो मागील काही दिवसांपासून मनीषा बिडवे हिच्याकडे कामाला होता. 22 मार्च रोजी त्याने तिच्या त्रासाला कंटाळून तिच्या डोक्यात काठी मारली, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. तिचा हा मृतदेह 6 दिवस घरातच पडून होता. परिसरात वास आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले आणि सदरील प्रकार समोर आला आहे.
पोलिसांच्या काही रेकॉर्डिंग आणि पुरावे सापडले आहेत. ज्याच्या आधारे पोलिसांची एक टीम आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाली. आरोपीला पकडल्यानंतर तपास करून रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल. तोपर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिली.
मनीषा बिडवेची हिस्ट्री काय?
मागील काही वर्षांपासून संबंधित महिला ही घरात एकटी राहत होती. द्वारका नगरी वसाहतीतील लोकांचा आणि तिचा फारसा संपर्क नव्हता. ती खासगी सावकारकी करत असल्याची देखील माहिती मिळतेय. काही लोकांचा तिच्या घरी येणंजाणं होतं. रात्री अपरात्री कधीही कोणी तिच्या घरी येत असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची. १)मनीषा आकुसकर आडस,२)मनीषा बिडवे कळंब, ३)मनीषा मनोज बियाणी कळंब, ४)मनीषा राम उपाडे अंबाजोगाई, ५)मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी, अशी माहिती अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. त्यामुळे आता नेमके सत्य काय हे आरोपीला पकडल्यानंतरच समोर येईल.