
कळंबमध्ये हत्या झालेल्या त्या महिलेचं संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध काय?
सुरेश धस यांनी विधानसभेत सांगितलेली कळंबची महिला ती हीच का?
कळंब : शहरातील द्वारका नगरी वसाहतीत गुरुवारी एका महिलेचं तिच्याच घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर या मृत महिलेची मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी चौकशी झाली होती, अशी देखील चर्चा आता समोर येऊ लागली आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र तसं असेल तर संबंधित महिलेचा मारेकरी कोण आणि पोलीस त्या दिशेनेही तपास करीत आहेत का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 5 ते 6 दिवसांपासून संबंधित महिलेचं मृतदेह घरात पडून होतं, शेजाऱ्यांना वास आल्याने सर्व प्रकार समोर आला.
काय आहे प्रकरण?
कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत मागील काही वर्षांपासून मनीषा कारभारी-बिडवे अंदाजे 40 ते 45 या वयाची महिला राहत होती. ती एकटीच राहत होती. बुधवारी वसाहतीतील लोकांना वास येऊ लागला. कोणीतरी प्राणी मृत झाला असेल या विचाराने शेजारच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्षित केले. मात्र गुरुवारी मृत महिलेच्या घराकडून हा वास अधिक तीव्र झाल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. बाहेरून कुलूप असल्याने पोलिसांनी मागच्या बाजूने किचनमध्ये प्रवेश केला असता,डोक्याला मार लागलेला आणि सडलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला.
सहायक पोलीस निरीक्षक पुंडगे यांनी याबाबत सांगितले की, व्दारका नगरी, कळंब येथे मनिषा कारभारी बिडवे यांचे घरामध्ये प्रेत असल्याबाबतची माहीती मिळाल्यावरुन आम्ही सोबत पोलीस स्टाफ सह घटनास्थळी जावुन पाहणी केली. मनिषा कारभारी बिडवे यांचे घर हे बंद स्थितीत असलेले दिसल्याने आम्ही घराच्या मागच्या दरवाज्याने किचनच्या खिडकीतुन पाहिले असता एक प्रेत दिसतं असुन ते पुर्ण सडलेले दिसले व तिला डोक्याला मार लागुन मयत झाली असावी, असं सहायक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय
संबंधित महिला ही घरात एकटी राहत होती. द्वारका नगरी वसाहतीतील लोकांचा आणि तिचा फारसा संपर्क नव्हता. ती खासगी सावकारकी देखील करत असल्याची देखील माहिती मिळतेय. काही लोकांचा तिच्या घरी येणंजाणं होतं. रात्री अपरात्री कधीही कोणी तिच्या घरी येत असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. त्याचबरोबर तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. पोलिसांनी चौकशी साठी संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.
संतोष देशमुख प्रकरण आणि मृत महिलेचं कनेक्शन काय?
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले होते. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी संतोष देशमुख हत्येचे मास्टर माईंड कोण आणि देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे झाली होती याबाबत विधानसभेत आवाज उठवला होता. इतकचं नाही तर कळंबच्या एका महिलेमार्फत खोटा गुन्हा दाखल करून देशमुख यांना अडकवण्याचा बी प्लॅन होता, असं देखील धस म्हणाले होते.
त्यामुळे ती कळंबची महिला कोण? याबाबत त्यावेळी खूप चर्चा झाली होती. आता असं बोललं जातं की धस यांनी सांगितलेली महिला ही मृत मनीषा कारभारी-बिडवे होती आणि त्याप्ररकणी तिची चौकशी देखील झाली होती. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. याबाबत बीड पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना मुद्द्याचं बोलू च्या टीमने संपर्क करून याबाबत विचारले असता, बीड येथे आपली पोस्टिंग थोडी उशिरा झाली आणि तपास हा सीआयडीकडे आहे. त्यामुळे याबाबत अधिक माहिती घेऊन सांगतो, असं ते म्हणाले. मात्र या चर्चेत जर सत्यता असेल तर या हत्येचा तपास त्या अँगलने होणे देखील गरजेचे.