
‘शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार’, मुख्यमंत्री फडणवीसांना कैलास पाटलांनी करून दिली त्यांच्याच विधानाची आठवण
फडणवीस यांनी प्रचारादरम्यान केली होती शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा, तोच व्हिडीओ पोस्ट करत आमदार पाटलांनी केला सवाल
धाराशिव : राज्याचे मुख्यमंत्री आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच अनुषंगाने धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आरसा दाखवत त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. आमदार कैलास पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा प्रचारादरम्यानचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आमचं सरकार आल्यास आम्ही तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असं म्हणत आहेत.
नेमकं काय म्हणत आहेत देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात?
फडणवीस एका प्रचार सभेत बोलताना दिसतायेत की, “पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आम्ही देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा, कोरा, कोरा. शेतकऱ्यांचा 7/12 करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे”, असं फडणवीस म्हणतायेत.
काय म्हणाले आमदार कैलास पाटील
शेतकरी कर्जमाफी करणार, या विधानाची आठवण करून देताना आमदार कैलास पाटील लिहतात, “मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या पावन नगरीत आपले मनःपूर्वक स्वागत. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपण धाराशिव जिल्ह्यात येत आहात, यानिमित्ताने आपल्याला एक महत्त्वपूर्ण आठवण करून देऊ इच्छितो. निवडणुकीच्या प्रचारावेळी आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. तसा निर्णयही आपल्या तत्कालीन सरकारने घेतला असल्याचे शब्द तुमचेच होते. माझ्या धाराशिवसह तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या या शब्दावर विश्वास टाकून आपल्या पदरी भरभरून यश दिले. आता तो शब्द पाळण्याची नैतिक जबाबदारी तुमचीच आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाचा घात न करण्याची जबाबदारी तुमचीच आहे, असं कैलास पाटील म्हणाले.
पुढे बोलताना कैलास पाटील म्हणाले, आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र दरबारातून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा तुम्ही आज कराल व आपल्या शब्दाला जागाल, अशी आशा धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना लागून आहे. शेतकऱ्याविषयी आपले प्रेम खरे असेल तर आपणच केलेल्या घोषणेवर अंमलबजावणी करण्यासाठी वाट कसली पाहताय?, असा सवाल देखील कैलास पाटील फडणवीसांना केला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस या उत्तर देतात हे पाहावं लागेल.
https://www.facebook.com/share/v/1Hy8ncEZ5L/?mibextid=wwXIfr
यावर्षी कर्जमाफी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
वारंवार शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नाला सामोरे जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले राज्याचा कारभार हकताना सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. यावर्षी काय पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, त्यामुळे यावर्षीचे आहे तेच पिककर्जाचे पैसे भरा, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबद्दल विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, अशी चर्चा होत आहे. त्यात यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, या आशेवर शेतकरी बसले होते. मात्र कर्जमाफी तर नाहीच परंतू शेतकऱ्यांसाठी काही ठोस निर्णय देखील अर्थसंकल्पात घेण्यात आले नाही.