
कळंब शहरात महिलेची हत्या; घटनेनंतर परिसरात खळबळ
अनैतिक संबंधातून खून झाल्याची दबक्या आवाजात चर्चा
कळंब : शहरात एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झालीय याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून अनैतिक संबंधातून हा प्रकार झाला असावा, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे.
शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना 2 दिवसांपासून उग्र वास येत होता. कसला वास येतो म्हणून त्यांनी गुरुवारी पोलिसांना संपर्क केला. ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब शहरातील द्वारका नगरीत मनीषा नावाची महिला मागील काही वर्षांपासून एकटी राहत होती. वसाहतीतील लोकांना तिच्या घराकडून उग्र वास येत होता. पोलिसांना संपर्क केल्यावर पुढील प्रकार समोर आला आहे. प्राथमिक दृष्ट्या या महिलेचा खून झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अधिक तपास पोलीस करीत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळंब पोलिसांनी सांगितले.