
भारताने पकड्यांची औकात दाखवली; एअर स्ट्राईक करत पहलगामचा बदला घेतला
9 ठिकाणांना लक्ष्य करत 24 क्षेपणास्त्र डागले
भारताच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल करून दाखवत पकड्यानं त्यांची औकात दाखवली आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. याबाबत भारतीय सरकारने निवेदन जारी करत माहिती दिली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली. इतकंच नाही तर ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती भारत सरकारकडून निवेदनाद्वारे देण्यात आलीय. हे तिन्ही सैन्यांचे संयुक्त ऑपरेशन होते. भारताच्या बलाढ्य सैन्याने पाकिस्तानमधील 4 आणि पाकव्याप्त काश्मीर मधील 5 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. भारतीय गुप्तचर संस्था RAW ने सर्व टार्गेट निश्चित केली होती, त्यानंतर संपूर्ण नियोजनाने लष्कर आणि जैशच्या तळांवर हल्ला करण्यात आला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केली आहे. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून अचूक हल्ला करण्यात आला आहे. या 9 ठिकाणांमध्ये बहवलपूर (2), मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक अमरू, सियालकोट या ठिकाणांचे समावेश आहे. या हवाई हल्ल्यात या ठिकाणी असलेले अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. ज्यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये सर्वाधिक विनाशाचे दृश्ये पाहायला मिळाली. त्यामुळे भारत फक्त इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश या हवाई हल्ल्यातून आता संपूर्ण जगाला गेला असल्याचे बोलले जात आहे.
जम्मूच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत-पाकमधील सबंध आणखी तणावपूर्ण झाले होते. अखेर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करत एकप्रकारे पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भारताच्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानवर 24 क्षेपणास्त्रे डागली आहेत.
शाहबाज शरीफ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून म्हटलं आहे की, “शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला ‘अॅक्ट ऑफ वॉर'(युद्धाची कृती) असं म्हटलं जाईल.” शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे, “भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत.” मात्र एकूणच भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यात कितीजण मृत्युमुखी पडलेत याचा अधिकृत आकडा अजून बाहेर आलेला नाही. मात्र काही माध्यमातून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हवाई हल्ल्यात 30 जण ठार झाले आहेत. त्यात जैश-ए -लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे.