
धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख
जिल्ह्यात मोठं ड्रग्स रॅकेट सक्रिय
धाराशिव जिल्हा तसा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक त्रासांना कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या यादीत या जिल्ह्याचे नाव आघाडीवर असतं. मात्र यंदा धाराशिव जिल्हा भलत्याच कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. ते म्हणजे ड्रग्स प्रकरण. धाराशिव जिल्ह्यातील साडे तीन शक्तिपीठांपैकी संपुर्ण 1 पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान आहे. मात्र या तुळजापुरात ड्रग्सविक्री करणाऱ्यांचं मोठं रॅकेट पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी कारवाई करत 36 ड्रग्सविक्रेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 13 ते 14 आरोपी हे पुजारी असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेता मंत्रिमंडळात देखील याबाबत चर्चा झाली. अमली पदार्थाची विक्री थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक कठोर पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मागील 2 ते 3 वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यात ड्रग्सची एन्ट्री झाली होती. त्यामुळे येथील नागरिक हैराण आहेत. तुळजापूर, परंडा आणि धाराशिव शहरात ड्रग्स विक्रेत्यांचे जाळे पसरले होते. तरुणांसह शाळा कॉलेजला जाणारे किशोरवयीन मुलं देखील ड्रग्सच्या आहारी गेल्याने पालक हैराण झाले आहेत. काही मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम झालं आहे. परंडातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मिळून याविरोधात आवाज देखील उठवला. निवेदनं देखील दिली, मात्र कारवाई काही झाली नाही.
14 फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यात पहिली कारवाई.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी तामलवाडी येथून एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली. तपासादरम्यान, ड्रग्स विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली, जी या ड्रग्स तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते.
पुढे पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली, ज्यात स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले की आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे 5 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोने देखील जप्त करण्यात आले. मात्र पोलिसांनी मुंबईतून आरोपी पकडले पण राजकीय पदाधिकारी असणारे आरोपी जे तुळजापुरात खुलेआम फिरत होते त्यांना पोलीस अजून पकडू शकलेली नाही. त्यामुळे आत्तापर्यंत 22 आरोपी रेकॉर्डला फरार आहेत म्हणून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होतो.
तुळजापूरपेक्षा परांड्यात ड्रग्सचं मोठं रॅकेट
परंडा तालुक्यातही मोठ्याप्रमाणात ड्रग्स पेडलर झाल्याने तिथेही किशोरवयीन मुलांना देखील सहज ड्रग्स उपलब्ध व्हायचा. 2-3 वर्षात या ड्रग्सचा बाजार इतका वाढला होता तरी पोलिसांनी उरुसात एक कारवाई करून 2 आरोपी पकडले मात्र पुढे जाऊन तपासात तो ड्रग्स नसून कॅल्शियम क्लोराईड असल्याचा रिपोर्ट आला. त्यामुळे केस रफादफा. मात्र यावर भाजपचे माजी आमदार तथा वरिष्ठ पदाधिकारी सुजितसिंह ठाकूर यांनी पोलिसांवर मोठा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केलीय. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोललो असून ड्रग्स विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.
आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत याविरोधात आवाज उठवला होता. तर परांड्याचे माजी आमदार राहुल मोटे आणि सुजितसिंह ठाकूर यांनी देखील आता याविरोधात बोलायला सुरू केलं आहे. मात्र माजी पालकमंत्री आणि परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी मात्र यावर अजूनतरी चुप्पी साधली आहे.
धाराशिवला अतुल कुलकर्णी यांनी काहीकाळ पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. ते आता सोलापूर ग्रामीण चे एसपी झाल्यावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतून कारवाई केली, अशी देखील चर्चा आहे.
परंडात इतक्या सहज ड्रग्स विक्री होत असताना एकही कारवाई झाली नाही. मात्र शेजारच्या बार्शी पोलिसांनी कारवाई करत परांड्याचे पेडलर पकडले त्यांच्याकडून ड्रग्स, पिस्तुल, गाडी जप्त केली. धाराशिव जिल्ह्यातील पोलिसांनी तुळजापूरचं प्रकरण इतकं मोठं झालं असताना ड्रग्सचा हब झालेल्या परांड्यात का कारवाई केली नाही, यावर देखील संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना हफ्ता मिळाल्याशिवाय हे होऊ शकत नाही असाही आरोप केला जातोय. परांड्यात राजस्थानमार्गे पाकिस्तानमार्गे ड्रग्स येतो असे देखील बोललं जात होतं. सुजितसिंह ठाकूर यांचं म्हणणं आहे की परांड्यात तुळजापूरपेक्षा मोठा रॅकेट चालतोय. फरार आरोपींची बँक खाती गोठवून संपत्ती जप्त करण्याची कारवाई करावी करा, अशी मागणी त्यांनी केलीय. बार्शी पोलिसांनी परंडाचे असद दहलूज, वसीम बेग, मेहफुज शेख, जावेद मुजावर, हसन चाऊस, दीपक काळे, शेळके, साजिद मुजावर, फिरोज उर्फ मस्तान शेख अशा 9 जणांना आरोपी केलंय. आता बार्शी पोलिसांसारखी जाग धाराशिव पोलिसांना येते का हे पहावं लागेल.
मराठवाड्यात झोपेच्या गोळ्या, खोकल्याचं औषध याने तरुणाई नशा करतेय हे समोर आलं होतंच. मात्र आता थेट ड्रग्स शालेय मुलांच्या स्कुल बॅगपर्यंत पोहचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक मुलं ड्रग्सचा नशा करून मानसिक रोगी झाल्यात. अंमली पदार्थ मिळवण्यासाठी घरात चोरी करणे, खासगी सावकाराकडून भरमसाठ व्याजाने पैसे घेणे, मारामाऱ्या करणे, त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होणे, याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे वेळीस यावर आळा घालणे तितकेचं गरजेचं आहे. त्यावर आता धाराशिव पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष असणार आहे.
–मुस्तान मिर्झा – 8983833838