
सुरेश अण्णा धस, विश्वासाला तडा जातोय; हे वागणं बरं नव्ह!
सुरेश अण्णा धस, हे नाव आम्हा मरावाड्याच्या लोकांना तसा परिचित. त्यात त्यांची इरसाल भाषेत केलेली भाषणं ऐकायला मजा येते. काही डान्सच्या व्हिडीओमुळे तर अण्णा दिलखुलास माणूस असल्याचं लांबूनचं वाटायचं. आये लवांडेssss हा वाला व्हिडीओ तर आजपण मिम्स म्हणून वापरला जातोय. रोखठोक आमदार म्हणून अण्णांची प्रतिमा. त्यात प्रकरण आलं. मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचं. खूप खात्रीशीर आणि जबाबदारीने सांगतोय की या प्रकरणात जर सुरेश धस नसते आणि त्यांनी बाजू लावून धरली नसती तर इतर केसप्रमाणे या देखील केसला पाहिलं गेलं असतं. अण्णांमुळे वाल्मिक कराड जेलात गेला, हे प्रकरण इतकं गाजलं आणि अनेक गोष्टी बाहेर आल्या त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. जेंव्हा कधी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण न्याय मिळेल, ते मिळवून देण्यामध्ये सुरेश धस यांचा सगळ्यात मोठा वाटा असेल.
संतोष देशामुख यांचा खून निर्घृण होता की सगळ्यांच्याचं डोळ्यात अश्रू होते. आपला माणूस गेला म्हणून मस्साजोगच्या मुस्लिमांनी ईद साजरी केली नाही, नवीन कपडे घेतले नाही. नमाज पठण करून घरी न जाता आदी धनंजय देशमुख यांची जाऊन भेट घेतली. मिठी मारून अश्रूंना वाट करून देशमुख कुटुंबियांचं दुःख वाटून घेतलं. यावरून लक्षात येतं की संतोष देशमुख हा माणूस काय होतं. त्यामुळे अशा माणसाच्या केसमध्ये अन्न-पाणी विसरून अण्णांनी प्रकरण लावून धरलं, अनेकांचे बुरखे फाडले, विधानसभेतून खून किती निर्घृणपणे करण्यात आल्याचं संपूर्ण राज्याला सांगितलं.
अण्णा, हिरो अण्णा पण,…
त्यामुळेचं अण्णा हिरो वाटायला लागले होते. त्या बोली भाषेमुळे अण्णा आपले वाटायला लागले होते. पण पुढं असं काही घडत होतं की अण्णांवर विश्वास ठेवावा की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पहिले तर इतके आरोप करून त्याच धनंजय मुंडे यांची भेट घेतली. पहिलं म्हणले तब्येतीची विचारपूस करायला गेले. त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणले 3 तास चर्चा झाली, हे म्हणाले 20 मिनिटे. जर प्रदेशाध्यक्ष खरे असतील तर 3 तास असं काय बोलणं झालं. कुठलं साठं-लोटं झालं. कुठला तह आणि कुठली डील झाली? या प्रश्नांना वाव आपोआप येणारच ना.
खोक्याची पाठराखण का?
त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरण. या सतीश भोसलेने त्या भागात काय हैदोस माजवलाय, त्याची किती दहशत आहे, तो कशाची शिकार करतो, ऊसाच्या टोळीचा की सोनं चोरी करणाऱ्या टोळीचा तो मुकादम आहे, हे आम्हाला पत्रकार म्हणून माहिती होऊ शकत नाही का? आणि त्याला तुम्ही “होय माझा कार्यकर्ता होता नाही आहे आणि तो काय मोठा खोका नाही” असं तुम्ही राज्याच्या मीडियावर येऊन सांगता. मग त्याच्याकडे रीलमध्ये दिसतोय तो पैसा, व्हिडीओमध्ये करतोय ती अमानुष मारहाण, त्याच्याकडे असलेली 40 लाखांची लक्जरी गाडी कुठून येते ओ? आणि तुम्ही म्हणता तो सामान्य आहे.
तुम्ही पाठीशी घातल्यास खोक्या उद्याचा आका का होणार नाही?
ज्या रूमचा 1 दिवसाचा भाडं 20 ते 30 हजार रुपये असतो, तो मुंबईला गेल्यावर अशा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतो, तर कुठून येतो ओ इतका पैसा. आणि त्याला तुम्ही पाठीशी घालता, त्याच्यावर इतके गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याची तुम्ही पाठराखण करता की तो वाल्मिक कराड इतका मोठा नाही. मग वाल्मिक कराडही घरगडीचा इतका मोठा आका झाला ना, तर याला जर तुमच्या सारख्याने पाठीशी घातलं तर तो ही पुढचा वाल्मिक कराड होणार नाही, हे कशावरून.
कथित पीए आणि अण्णांची पलटी
मधल्या काळात तुमचा कथित पीए धाराशिव शहरात संतोष देशमुख कुटुंबियांसाठी पैसे गोळा करताना पकडला गेला. मराठा आरक्षण मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगला चोप दिला. त्यावेळी तुम्ही धडधडीत माझा पीए नाही म्हणून सांगितलं. नंतर जेंव्हा धाराशिव लाईव्ह या डिजिटल पोर्टलची तुमच्या लेटरहेड ने माहिती मागवण्यात आली त्यात तुम्ही संबंधित व्यक्ती हा तुमचा पीए असल्याचं लिहलय. नंतर अंगलट येत असल्याचे पाहून तुम्ही पुन्हा पलटलात आणि माझी माझ्या लेटर हेडवर खोटी सही करून कोणीतरी त्याचा गैरवापर केला, असं तुम्ही म्हणालात अण्णा. मग तशी तुम्ही पोलिसात तक्रार केली का? कारण इतक्या मोठ्या पक्षाचे इतके मोठे आमदार तुम्ही आणि तुमच्या लेटर हेडचा गैरवापर केला जातोय, हा प्रकार तुम्हाला गंभीर वाटत नाही का?
बडे-बडे इंटरव्ह्यूमे बोहत बडी बाते, फिर वापस आते
नुकतंच तुम्ही साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत माझ्या विरोधात खोक्या प्रकरण लावून धरत खुनाचा षडयंत्र केला गेला. आणि त्या षड्यंत्रात न्यूज18 लोकमतचे विलास बडे आणि स्टोरी डॉट कॉमचे विशाल बडे यांचं कट कारस्थान आहे असा गंभीर दावा अण्णा तुम्ही केला. तुम्ही एकदा-दोनदा नव्हे तर 5 ते 6 वेळेस विलास बडे यांचं नाव घेतलं. मात्र आज तुमचा व्हिडीओ आलाय ज्यामध्ये तुम्ही म्हणताय मी अनावधानाने विलास बडे यांचं नाव घेतलं. पुन्हा तुम्ही पलटी मारली.
स्टोरी डॉट कॉमला मनापासून शुभेच्छा तुम्हीच दिल्या की अण्णा
अण्णा चला तुम्हाला विशाल बडे यांचं नाव घ्यायचं असेल पण तुम्ही विलास बडे हे नाव घेतलं असेल. पण तुम्ही विलास बडे यांच्या चॅनेलचं 2-3 वेळेस नाव घेतलं जे saam ने बीप केलं. तुम्ही विलास बडेंचा असणारा बडे मुद्दे या शोचं देखील नाव घेतलं. आणि नंतर म्हणता की अनावधानाने विलास बडे नाव घ्यायचं होतं. पण तुम्ही तर खूप आत्मविश्वासाने विलास बडे यांचं नाव घेत होतात. तो व्हिडीओ पण मी बातमीत जोडतोय म्हणजे लोकांना कळेलच कोण खोटं आणि खरं.
बरं स्टोरी डॉट कॉमच्या विशाल बडे यांचं नाव घ्यायचं होतं तुम्हाला तर नुकतंच तुम्ही विशाल बडे यांना 1 लाख subscribers पूर्ण झाल्याबद्दल इन कॅमेरात मनापासून शुभेच्छा दिल्या की. इतकंच नाही तर मागील काही दिवसांपासून तुम्ही विशाल बडे यांना 3-4 वेळेस मुलाखती दिल्या. त्याला काय म्हणायचं. अण्णा अशाने आपली विश्वासार्हता कमी होत चाललीय त्यामुळे 1 महिन्यापूर्वी हिरो वाटणाऱ्या तुमच्याबद्दल मला इतकं लिहावं वाटलं.
मग प्रश्न येतो की संतोष देशमुख प्रकरण लावून धरलं ते कमी होतं का. पण अशी देखील चर्चा होतीय की अण्णा यांचे मुंडे बहीण-भावाबद्दल राग होता आणि तो राग अण्णांनी या प्रकरणात काढला. कारण त्यानंतर मागील 3 महिन्यात बीड जिल्ह्यात अनेक गंभीर प्रकार झाले. मात्र अण्णा तेवढ्या तीव्रतेने बोललेले दिसले नाही. त्याउलट आरोपीना साधं म्हणून पाठीशी घातलं. अर्धमसला मशिद स्फोट प्रकरणालाही तुम्ही आरोपीना पिऊन कुटाना केला, असं एका ओळीत संपवलं. मग अण्णा इतका दुटप्पी पणा का? इतक्या पलट्या का? त्यामुळे तुमच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास कमी होत चालला आहे. जो तुमच्या सारख्या धडाडीच्या आमदारासाठी चांगलं नाही.
मिर्झाकी कलम
मुस्तान मुमताज मुख्तार मिर्झा (8983833838)