शिक्षण–समाजसेवेची एकत्र धग : प्रा. डॉ. मिनाक्षी भवर

प्रा. डॉ. मिनाक्षी श्रीधर भवर मराठवाड्यातील शिक्षण, समाजकारण आणि महिला सक्षमीकरण या तिन्ही क्षेत्रात समांतरपणे प्रभावी कामगिरी करणारे नाव. सावित्रीबाई फुले महाविद्यालयात उपप्राचार्य पदावर कार्यरत असलेल्या या प्राध्यापिका गेली तीन दशके ज्ञानदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत आहेत. उच्च शिक्षणाची भक्कम पायाभरणी आणि सामाजिक जाण या बळावर त्यांनी “मराठवाड्यातील महिला नागरी सहकारी बँका – एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर पीएचडी पूर्ण केली. शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करून आपली वैचारिक ताकद सिद्ध केली आहे.

समाजातील कामगिरी आणि योगदान पाहता त्यांना समाजरत्न, नारीशक्ती, नॅशनल बिल्डर असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. “समाजाचे आपण काहीतरी देणे लागते” या भावनेतून त्यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून आरोग्य, महिला आर्थिक उन्नती आणि सामाजिक संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. विविध आरोग्य तपासणी शिबिरे, बचतगटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी आयोजित होणारे महिला महोत्सव, तसेच महिलांच्या मनोरंजनासोबत सक्षमीकरण घडवणारे ‘स्मार्ट श्रीमती’ सारखे उपक्रम या सर्वांमधून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष म्हणून देखील त्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

महिला दिनाच्या औचित्याने दरवर्षी गरजूंना शिलाई मशीन देऊन त्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे काम डॉ. भवर सातत्याने करतात. २००५ मध्ये महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन त्यांनी २३ महिलांना घेऊन क्रांतीज्योती महिला बचत गट स्थापन केला. या गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी कापड व्यवसाय, ब्यूटीपार्लर, गृहउद्योग सुरू केले असून त्यांना सतत आर्थिक मदत व मार्गदर्शन देण्याचे काम डॉ. भवर करीत आहेत.

त्याचबरोबर विविध वर्तमानपत्रांसाठी माहितीपूर्ण लेखन करून त्या समाजजागृतीचे कार्यही करत आहेत. प्रियदर्शनी बँक आज धाराशिव, सोलापूर, बीड अशा विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून या बँकेच्या उभारणीमध्ये त्यांनी पती श्रीधर भवर यांना दिलेली साथ मोलाची ठरली आहे. या बँकेमार्फत ओबीसी महामंडळ व अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांद्वारे समाजातील शेकडो कुटुंबांना कर्ज मिळून त्यांचा व्यवसाय उभा राहण्यास मदत झाली आहे.

आज डॉ. मिनाक्षी भवर कळंब नगरपरिषद नगराध्यक्षा पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत. एक सुशिक्षित, संवेदनशील आणि रबराचा शिक्का न बनणारी नेत्री अशी त्यांची ओळख आहे. शिक्षण, बँकिंग, उद्योग, समाजकारण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रात भवर कुटुंब सक्रिय असल्याने त्याचा निश्चितच फायदा त्यांना मिळत आहे.

नगरपरिषदेसाठी त्यांचे स्पष्ट आणि विकासाभिमुख व्हिजन आहे. कळंबमध्ये महिलांसाठी तातडीने स्वच्छतागृह उभारणे, विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट स्कूल आणि प्रिस्कूलिंग सुरू करणे, पाणी नाली व्यवस्था, रस्ते-लाईट्स सुधारणा, योग्य ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आणि हरित कळंब निर्मिती या सर्वांवर त्यांचा ठाम भर आहे. अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असल्यामुळे उपलब्ध निधीचा योग्य आणि परिणामकारक वापर करून शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर त्या विशेष लक्ष देणार आहेत.

त्यांचा मुलगा आणि सून हे दोघेही डॉक्टर्स असून, त्यांना घेऊन कळंबमध्ये नाममात्र शुल्काचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. यामुळे कळंबच्या नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अंबाजोगाई, लातूर, बार्शी येथे जाण्याची गरज भासणार नाही. शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि विकासदृष्टी यांचा सुंदर संगम असलेल्या डॉ. मिनाक्षी भवर या कळंब शहराच्या प्रगतीसाठी एक आशादायी नेतृत्व बनू शकतात, यात शंका नाही.

Back to top button
error: Content is protected !!